रावण वध - श्रीरामांच्या हातून पराक्रमी रावण कसा पडला? | Ravana Vadha - the end of Ravana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आपले पुत्र, भाऊ आणि सगळ्या प्रमुख महारथ्यांच्या मृत्युनंतर अत्यंत संतापलेल्या रावणाने वानरसेनेवर हल्ला करून त्यांच्यात हाहाकार माजवला. तमसअस्त्राचा वापर करून रावणाने अनेक वानरांना ठार केले. वानरांना अशा प्रकारे मारताना पाहुन श्रीराम आणि लक्ष्मण यांनी रावणाचा सामना करायचा निश्चय केला. लक्ष्मणांनी रावणावर आपल्या बाणांचा वर्षाव केला. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरु झाले. लक्ष्मणांनी त्याच्या बाणांनी रावणाचा सारथी ठार केला आणि रावणाचे धनुष्य मोडून टाकले. विभिषणाने त्याच्या मुद्गलाने रावणाच्या रथाचे घोडे मारून टाकले. यामुळे चिडलेल्या रावणाने भाला उचलला आणि आपल्या भावावर प्रहर केला. लक्ष्मणांनी त्याच्या बाणांनी त्या भाल्याचे तीन तुकडे केले . रावणाने आणखी एक भाला उचलून विभीषणावर नेम धरला. विभीषणाच्या जिवाला धोका आहे हे बघून लक्ष्मणांनी रावणावर बाणांचा अखंड वर्षाव केला. रावणाने विभीषणाचा नाद सोडून तोच भाला लक्ष्मणांवर फेकला. तो छातीत लागल्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. हे पाहताक्षणी श्रीराम लक्ष्मणाजवळ गेले आणि त्याच्या छातीतला भाला आपल्या हातांनी बाहेर काढला. हनुमान आणि सुग्रीव यांना लक्ष्मणांच्या रक्षणासाठी ठेवून श्रीराम रावणाशी लढू लागले. रथाविना लढणारा रावण श्रीरामांच्या बाणांचा सामना करू शकला नाही आणि तो लंकेत परतला. रावण युद्धभूमीवरून जाताच श्रीराम लक्ष्मणांजवळ आले आणि त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन शोक करू लागले. हे पाहून वानरांचे वैद्य असलेले ताराचे वडील सुषेण सांत्वनासाठी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी सांगितले की लक्षमण फक्त बेशुद्ध झाले आहेत. त्यांनी जम्बुवंतांनी सांगितलेल्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन सर्व जखमा भरणारी विशल्यकर्णी, आणि जीव वाचवणाऱ्या संजीवनी, सौवर्णकर्णी आणि संधानकर्णी या औषधी वनस्पती आणायला हनुमंतांना सांगितले. श्री हनुमंत मनाच्या गतीने द्रोणगिरी पर्वतावर पोचले आणि नेमक्या वनस्पती ओळखू न आल्यामुळे पूर्ण द्रोणगिरी पर्वतच उचलून घेऊन आले. वैद्य सुषेणांनी नेमक्या वनस्पती निवडून त्यांचे औषध तयार केलं आणि त्याचा वास लक्ष्मणांना दिला. त्या वासाने लक्ष्मणांना शुद्धही आली आणि त्यांच्या जखमाही भरून आल्या. रावण पुन्हा रथात बसून युद्धासाठी आला तेंव्हा इंद्रदेवांनी आपल्या मातली नावाच्या सारथ्याबरोबर त्यांचा रथ श्रीरामांसाठी पाठवला. मातलीने देवराज इंद्राच्या रथात बसून रावणाशी युद्ध करण्याची श्रीरामांना विनंती केली. इंद्राच्या रथावर बसलेले श्रीराम आणि दशानन ( दहा तोंडांचा रावण ) यांच्यात घनघोर युद्ध सुरु झाले. रावणाने श्रीरामांवर केलेल्या नागास्त्राच्या प्रयोगामुळे त्याच्या बाणांचे रुपांतर भयानक नागांमध्ये झाले आणि ते नाग श्रीरामांच्या दिशेने येऊ लागले. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी श्रीरामांनी गरुडास्त्राचा प्रयोग केला, ज्यामुळे सगळे नाग नष्ट झाले. रावणाने श्रीरामांवर फेकलेल्या भाल्याचे श्रीरामांनी मातलीने इंद्राकडून आणलेल्या अस्त्राने तुकडे केले. श्रीरामांनी विविध प्रकारच्या बाणांनी रावणावर हल्ले केले आणि त्याच्या शरीराला आपल्या बाणांनी बांधून टाकले. श्रीराम स्वतःदेखील रावणाच्या बाणामुळे रक्तबंबाळ झाले होते. श्रीरामांकडून रावणाचा पराभव होण्याची लक्षणे पाहुन त्याच्या सारथ्याने रथ युद्धभूमीपासून लांब न्यायचे ठरवले. पण त्याने रथ वळवताच चिडलेल्या रावणाने त्याला रथ पुन्हा युद्धभूमीकडे नेण्यास सांगितलं. रावणाचा रथ परत येताना पाहुन श्रीराम मातलीला म्हणाले की बहुतेक आज राक्षसराज रावणाने युद्धात आपला जीव गमावण्याचा निश्चय केला आहे. श्रीरामांनी मातलीला निर्भयपणे आणि सावधपणे रथ रावणाच्या दिशेने न्यायला सांगितले. पुन्हा एकदा दोघांमध्ये भीषण युद्ध सुरु झाले. श्रीरामांना त्यांच्या विजयाची खात्री होती, तर रावणाला आपला मृत्यू समोर दिसत होता. रावणाने श्रीरामांच्या रथावर बाण सोडले पण इंद्रदेवांच्या दैवी रथाला आपटून ते बाण खाली पडले. श्रीरामांनी रावणाच्या रथावरचा ध्वज त्यांच्या बाणांनी चिंध्याचिंध्या करून टाकला. चिडलेल्या रावणाने रामांच्या घोड्यांवर अनेक बाण सोडले पण ते दैवी घोडे त्यामुळे किंचितही घाबरले नाहीत. रावणाच्या अनेक मायावी अस्त्रांना श्रीरामांनी आपल्या दैवी अस्त्रांनी नष्ट करून टाकलं. रावणाने मातलीवरही अनेक बाण सोडले, त्यामुळे संतप्त झालेल्या श्रीरामांनी क्षुर नामक अस्त्राने रावणाचे मस्तक धडावेगळे केले. पण त्या मस्तकाच्या जागी आपोआप एक नवे मस्तक प्रकट झालं. श्रीरामांनी पुन्हा एकदा ते छाटून टाकल्यावरही त्या जागी एक नवे मस्तक उगवलं. रावणाचा अंत होण्याची लक्षणे दिसत नव्हती. पण मातलीने श्रीरामांना ब्रह्मदेवांच्या ब्रम्हास्त्राचा उपयोग करायचा सल्ला दिला. हे ऐकून श्रीरामांनी त्यांना अगस्त्य मुनींनी दिलेल्या आणि इंद्रदेवांनी तयार केलेल्या ब्रम्हास्त्राचे आवाहन केले. मंत्रोच्चारण करत श्रीरामांनी त्यांच्या धनुष्याच्या प्रत्यंचेवरून रावणावर पूर्ण शक्तीनिशी ब्रम्हास्त्र सोडले. त्याच्या प्रहारामुळे रावणाचे हृदय छिन्नविछिन्न झालं आणि त्याचा प्राण गेला. रावण मरताच सगळे राक्षस घाबरून इकडे तिकडे धावत सुटले आणि वानरसेनेने श्रीरामांचा जयजयकार केला. रावणाच्या उपद्रवाने त्रासलेल्या देवतांनी, गंधर्वांनी, ऋषींनी आणि इतर सगळ्यांनीच आनंदाने श्रीरामांचा जयजयकार केला. आजही संपूर्ण भारतात श्रीरामांनी केलेल्या रावणवधामुळे धर्माने अधर्मावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. दरवर्षी अश्विन महिन्यातल्या शुक्लपक्षातल्या दशमीला हा उत्सव दसरा किंवा विजयादशमी म्हणून साजरा होतो.
    #bhakti #marathi #ramayan #dussehra #vijayadashami #jaishreeram #jaishriram #ravan

ความคิดเห็น •