आदिवासी पारंपारिक सण पचवी (नागपंचमी) सुरगाणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • आदिवासी भागातील पारंपरिक पचवी(नाग पंचमी) सणा विषयी समज गैरसमज/ अंधश्रद्धेचा पगडा.
    सुरगाणा ता.१२/८/२०२१( रतन चौधरी. महिती संकलन)
    सुरगाणा तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत कोकणा, महादेव कोळी, भिल्ल, वारली या जमाती महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सिमावर्ती भागातील डोंगर द-या खो-यात शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या समाजात अनेक सण उत्सव आजही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. यातच पावसाला सुरुवात झाल्यानंतर तेरा सणा नंतर पचवी हा सण साजरा केला जातो. या सणा विषयी पुर्वी पासून अनेक समज गैरसमज आहेत याविषयी ज्येष्ठ नागरिक देवराम देशमुख वय वर्षे ८१ यांच्या कडून माहिती
    जाणून घेतली असता ते म्हणाले की" आदिवासी बांधवां मध्ये तेरा, पचवी, पोळा, पितरा, दसरा, दिवाळी, होळी शिमगा,अखाती असे सण उत्सव आजही पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. नागपंचमी हा सण पचवी या नामोल्लेखाने साजरा केला जातो. या दिवशी केवळ नागाचीच पूजा केली जाते असे नाही तर या दिवशी बांबूच्या कुडाच्या भिंतीवर शेण मातीने सारवले जाते त्यावर चुना किंवा तांदळाच्या पिठाने बांबूच्या काडीचा ब्रशने पचवी लिहली जाते यामध्ये भिंतीवर चौकान काढून त्यामध्ये आदिवासींच्या नैसर्गिक देवता जसे वाघदेव, नागदेव, विंचू ,मोर, सुर्य, चंद्र, झाडे, फुले, पाने हि नैसर्गिक देवतांची चित्रे तसेच लाकडी औत,बैल,कासरा, भात, नागली लावतांना शेतकरी, औत हाकतांना शेतकरी, जंगलात
    गुरे चरायला घेऊन जाणारा, गुरे चारणारा बाळदी अशी रेखाचित्रे रेखाटली जात असत. घरातील कुटुंब प्रमुख हा या दिवशी उपवास केला जातो. संध्याकाळी गुरे जंगलातून घरी आल्यावर पुजा केली जाते. काढलेल्या चित्रांचे बांबूच्या सुपात आदिवासींच्या देवता, रानावनातील भुतं, खेतं यांच्या नावाने सुपात तांदळाच्या
    पुंजळया पाडल्यानंतर फार पुर्वी दगडी दिवा उपलब्ध नसल्यामुळे चिबड( रान काकडीचा प्रकार) मधोमध काप घेऊन त्यातील बिया काढून दिवा बनवत असत. किंवा
    दगडी दिव्यात तेल वातीचा दिवा लावून शेंदूर,गुलाल लावून दिवा ओवाळत आदिवासींच्या विविध देवता हिरवा, कणस-या, कणसरी, धनस-या, डोंगर मावली, महादेव, खंडेराव, बहिरम, चोखा हिरवा, बाटोक हिरवा, मूंज्या, इहमाय, मेचको हिरवा( गुप्त) सर्वात खतरनाक देव, यांची
    मनोभावे पूजा,प्रार्थना केली जाते. या दिवसा पासून काही
    नवीन मेनुचा आहारात समावेश केला जातो. यामध्ये अळचे पातवड, तांदळाच्या पिठाचे उंडे, नागलीच्या पिठाचे बोळकी, उपवासाची भगरीची कोंडी हे पदार्थ बनवले जात असत.
    अळूच्या पानांना बेसन पीठचा अथवा तांदळाच्या पिठाचा
    लेप देऊन त्यांना घड्या घालून एका पातेल्यात अर्ध पातेले पाणी घेऊन चुलीवर ठेवले जाते.
    पाण्याच्यावरती बांबूच्या काडीचा आधार देऊन अलगद पणे पाण्याच्यावर दाथरा बनवून त्यावर पीठ लावलेले घडी केलेले पातवड वाफेवर शिजवून घेतले जाते. पक्कं शिजलं की एका ताम्हण( परात) मध्ये घेऊन थंड झाल्यावर विळ्याने उभे आडवे कापून वड्या तयार करून त्याला पळीतील तेल, मोहरीची फोडणी दिली जाते. वरण, भात केला जातो. हाच निवद( नैवद्य) या रेखाटन केलेल्या चित्रातील नैसर्गिक देवतांना दाखविला जातो. सकाळी ते नैवद्य न फेकता गोठ्यातील गायींना घालून दिला जातो. तांदळाच्या ओल्या पिठाचे उंडे (लाडू) बनवून वाफेवर शिजवून घेतले जातात. तर त्या प्रमाणे नागलीच्या पीठात गुळ घालून बोळकी वाफेवर शिजवून घेतले जाते. या दिवशी उपवासाकरीता वरयी तव्यावर भाजून ती जात्यावर दळून त्या कोरड्या पिठात गुळ घालून उपवासाची कोंडी तयार केली जाते. हे पदार्थ लहान थोर आवडीने खात असत त्यामधून अनेक पोषणमूल्य मिळत असल्याने आपोआपच लहान बालकांचे कुपोषण कमी होत असे.
    पचवी सणाबाबत गैरसमज/ गैरसमजुती/ पारंपरिक समाजावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा
    पचवी या सणाबाबतीत काही आदिवासी क्षेत्रात अनेक समज, गैरसमज,गैरसमजुती तसेच अंधश्रद्धा आहेत त्या अशा या दिवशी आदिवासी
    आदिवासी म्हणजे नुसते ढोल पावली नाच गाणे नाही किंवा फाटका तुटका गबाळा मजबूर लाचार तर बिल्कुल नाही तर ह्या वेशात समृद्ध जीवनशैली जगणारा मानव आहे परंतु आजकाल अंधानुकरणातून आपली शिक्षीत , सुशिक्षित पिढी ही बाहेर विकत मिळणारे चित्र घेवून ज्याची कहानी पूर्णपणे अलग आहे तिची पूजा करतात आदिवासींसाठी हे चुकीचं आहे.
    ह्या चित्रांमध्ये कला, प्रमाणबद्धता अपार कल्पकता आहे म्हणून तर पाश्चिमात्यांना ह्या कलेची भूरळ पडली व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही कला सजावटीमध्ये विराजमान झालेली पाहायला मिळते.
    आपली संस्कृती,आपली परंपरा जोपासण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही समुहामार्फत पंचमी रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.आपल्या आदिवासी समाजात पचवी हा महत्वाचा सण असुन, आदिवासी समाजात घरील भिंतीवर शेणाने सारवुन त्यावर चुन्याच्या साहाय्याने निसर्ग देवतांचे चित्रे रेखाटून त्याचे पूजन केले जाते. परंतु सध्याच्या डिजिटल युगात ही परंपरा लोप पावत चालली आहे.आजकाल बाजारात मिळणारे चित्र भिंतीवर चिटकवून त्याचे पूजन केले जाते. परंतु ही पध्दत आदिवासी समाजाच्या संस्कृतीस शोभनीय नाही. म्हणून चांगली संस्कृती,
    परंपरा जोपासली जावी व ती एक पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित तसच प्रवाहीत
    व्हावी या उद्देशाने
    नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी, शहरात राहणाऱ्या समाजबांधवांना पारंपरिक पद्धतीने पचवी रेखाटन शक्य होत नसल्याने मिळेल त्या साधनांच्या साहाय्याने पचवी रेखाटन करून त्यांनी आपली परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सणाच्या निमित्ताने या लेखाततून आदिवासी जीवनशैली वर टाकलेला एक प्रकाश झोत व दृष्टीक्षेप.
    माहिती संकलनव संशोधन.
    रतन चौधरी. सुरगाणा.
    डांगी भाषा अभ्यासक.
    फोटो-
    आदिवासी बांधवांच्या पिढीतील देव देवता.
    पचवी निमित्ताने रेखाटली जाणारी भिंतीवरील रेखाचित्रे

ความคิดเห็น •