प्रजासत्ताक दिनानिमित्त लोणार नगरपालिकेच्या शाळेत विविध विकास कामांचे उद्घाटन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- प्रजासत्ताक दिनानिमित्त लोणार नगरपालिकेच्या शाळेत विविध विकास कामांचे उद्घाटन
लोणार नगरपालिकेच्या उर्दू व मराठी शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे यांच्या हस्ते शाळेच्या डिजिटल कम्प्युटर लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच हॅन्ड वॉश स्टेशन, पिण्याच्या पाण्याचे फिल्टर, मुलं व मुलींसाठी अद्ययावत शौचालय, डिजिटल कार्यालय, शाळेचे वाचनालय, तसेच वर्गखोल्यांचे अद्ययावत रूप यासारख्या नुकतेच पूर्ण झालेल्या सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष नूर मोहम्मद खान उर्फ बादशाह खान, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ मापारी, माजी शिक्षण सभापती शेख समद शेख अहमद, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पाटोळे, माजी नगरसेवक गजानन खरात, श्यामभाऊ राऊत, कंकाळ सर, विकास मोरे, रफिक भाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख इलियास, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सतीश कापुरे यांच्यासह पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे तसेच उपस्थित मान्यवरांनी यावेळी शाळांच्या विकासासाठी कायम योगदान देण्याचा संकल्प केला. त्यांनी शाळेच्या खेळाच्या मैदानावर सिमेंटचे गट्टू बसविण्याचे तसेच आजाद नगर येथील शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे लोणार नगरपालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी जुळवून घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.